औरंगाबाद : भोकरदन तालुक्यातील हसनाबाद रोडवरील खादगावजवळ सोमवारी रात्री 8 वाजता दोन दुचाकीची टक्कर होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन गंभीर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेरू पठाण (वय 40 वर्षे), त्यांचा मुलगा जुबेर पठाण (वय 22 वर्षे) (दोघे रा. हसनाबाद, ता.भोकरदन, जि.जालना) यांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला, तर योगेश कडुबा जाधव (वय 25 वर्षे) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. योगेश मानकापे (वय 23 वर्षे) व रवि मते (वय 28 वर्षे) (रा. जातेगाव, ता. फुलंब्री) हे दोघेे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश जाधव हा सोमवारी रात्री हसनाबाद येथून आपल्या मित्रांना घेऊन दुचाकीवरून जातेगाव येथे जात होता. रात्री 8 वाजेच्या सुमारास हसनाबाद-तळेगाव रोडने जात असताना खादगाव फाट्याजवळ समोरून आलेल्या शेरू पठाण यांच्या दुचाकीशी जाधव याच्या दुचाकीची जोरात धडक झाली. अपघात घडताच दोन्ही दुचाकीवर बसलेले रस्त्याच्या कडेला जोरात आपटले. त्यात शेरू पठाण व त्यांचा मुलगा जुबेर पठाण हे दोघे जागीच ठार झाले. योगेश कडुबा जाधव, योगेश मानकापे व रवि मते हे गंभीर जखमी झाले. रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांनी जखमींना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान योगेशचा काल रात्री मृत्यू झाला. या अपघाताची हसनाबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
















